बुलढाणा (विशेष प्रतिनिधी):
पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आगामी रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
६ हजार कर्मचाऱ्यांची फौज, २,०६९ बूथ सज्ज
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक अशा ६ हजारांहून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बालकांसाठी ‘घरभेट’ मोहीम
रविवारच्या मुख्य मोहिमेनंतर जे बालक लसीकरणापासून वंचित राहतील, त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. यामध्ये शहरी भागात सलग पाच दिवस आणि ग्रामीण भागात तीन दिवस कर्मचारी थेट घरभेटी देऊन वंचित बालकांना पोलिओचा डोस पाजणार आहेत.
“पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे.”
– डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा.
‘या’ अतिजोखमीच्या भागांवर विशेष लक्ष
मोहिमेदरम्यान बसस्थानके, रेल्वे स्थानके, वीटभट्ट्या, विविध बांधकामस्थळे तसेच स्थलांतरित व भटक्या कुटुंबांच्या वस्त्यांमधील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. एकही बालक लसीकरणाशिवाय सुटू नये यासाठी फिरती पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.
“नियमित लसीकरण झालेल्या बालकांनाही पल्स पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी आणि पालकांनी आरोग्य प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.”
– डॉ. मिलिंद जाधव, माता व बाल संगोपन अधिकारी.
आरोग्य विभागाने “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश देत, २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस अवश्य पाजण्याचे आवाहन जिल्ह्यातील जनतेला केले आहे.



Pingback: सावधान! 'एबीपी माझा'च्या नावाने सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल; 'ई-जनसमूह'च्या पडताळणी