तब्बल ७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि ट्रॅक्टर/वाहन जप्त; अकोल्याच्या चालकासह नागपूरच्या तंबाखू कंपनीवर गुन्हा दाखल!
शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त गस्तीदरम्यान एक मोठी कारवाई केली आहे. वरवट बकाल रोडवरील बेकरीसमोर तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा बेकायदेशीर, मानवी आरोग्याला घातक असलेला प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मालवाहू वाहनासह चालकाला ताब्यात घेण्यात आले असून नागपूरच्या एका बड्या तंबाखू उत्पादक कंपनीच्या संचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून २०२६ च्या रात्री १०:१० वाजेच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गुलाबसिंग किंता वसावे (वय ५२, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने शेगाव शहर हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, यादव बेकरीसमोर एक संशयित अशोक लेलँड मालवाहू वाहन (क्र. MH-40-GT-2965) उभे असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यात गोण्यांमध्ये भरून ठेवलेला लाखो रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा मिळून आला.
अन्न व औषध प्रशासनाने वाहनातून खालील ब्रँड्सचा साठा जप्त केला आहे:
बाजिराव गोल्ड (BAJIRAO GOLD) पानमसाला: ५० पोते (किंमत रु. १२,४८,०००/-)
मस्तानी तंबाखू (MASTANI TOBACCO): ११ पोते (किंमत रु. २,२८,८००/-)
नजर १००० पानमसाला व N-05 चेविंग तंबाखू: एकूण ५० पोते (किंमत रु. २१,३३,१२०/-)
प्रीमियम नजर ९००० (PREMIUM NAZAR 9000): ४० पोते (किंमत रु. १४,०४,०००/-)
अशोक लेलँड मालवाहू वाहन: (किंमत रु. २०,००,०००/-)
👉 एकूण जप्त मुद्देमाल: रु. ७०,१३,९२०/-
सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७ वर्ष, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) – मालवाहू वाहनाचा चालक.
M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (नागपूर रोड, पांढुर्णा, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) या कंपनीचे मालक/भागीदार आणि संचालक.
अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अप.नं. ३७९/२२६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६, २७ आणि ५९ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर धडक कारवाईनंतर १४ जून रोजी सकाळी ११:०२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव (मो. नं. ९९२२२७४७०९) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हा एवढा मोठा साठा शेगावात कोणासाठी आणला जात होता आणि याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.



Pingback: शेगावात महावितरणच्या 'स्मार्ट' मोहिमेत नियमांना केराची टोपली; वरिष्ठ अभियंत्यांचा आदेश डाव
Pingback: जळगाव जामोद येथील श्री आर. एस. पाखरे सरांना 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' प्रदान - E-Jansamu