E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

संत नगरीच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था; शेगाव बस स्थानकातील समस्यांबाबत मनसेचे निवेदन

शेअर करा : 𝕏

 

शेगाव : शेगाव बस स्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्थानक प्रमुखांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाची एक प्रत माननीय ठाणेदार, शेगाव शहर यांनाही देण्यात आली.

निवेदनात बस स्थानकातील अनेक पंखे बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना होत असलेला त्रास, प्रवाशांसाठी उपलब्ध असलेला वॉटर कूलर काढून टाकल्यामुळे निर्माण झालेली गैरसोय, परिसरात साचणारा घाण व कचरा तसेच रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कथित अवैध प्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

 

यावेळी मनसे शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर व शहराध्यक्ष परमेश्वर लाहूडकर यांनी वरील सर्व मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करत सांगितले की, शेगाव बस स्थानक हे संत श्री गजानन महाराजांच्या पावन नगरीचे प्रवेशद्वार असून दररोज हजारो भाविक व प्रवासी येथे ये-जा करतात. मात्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव, वाढती अस्वच्छता आणि रात्री सुरू असलेले संशयास्पद व अवैध प्रकार ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे संत नगरीची प्रतिमा मलिन होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव राहुल धनोकार, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, वाहतूक सेना अध्यक्ष रामा इंगळे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख समाधान शेगोकार व किरण शेगोकार प्रामुख्याने उपस्थित होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर स्थानक प्रमुख कोलपे साहेब व सहाय्यक ठाणेदार सोनटक्के साहेब यांनी निवेदनातील सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास प्रवाशांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही दिला.

1 thought on “संत नगरीच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था; शेगाव बस स्थानकातील समस्यांबाबत मनसेचे निवेदन”

  1. Pingback: होवू घातलेल्या निट पेपर का देण्यात आला 15 मिनीटाचा अतिरीक्त वेळ - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top