E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

महाले–गायकवाड वाद चिघळला; गुन्ह्यानंतरही आरोप-प्रत्यारोपांची धार कायम

गायकवाडांविरोधात BNS कलम 79 नुसार गुन्हा; समर्थक रस्त्यावर, तर श्वेता महालेंचा पुन्हा पलटवार

बुलढाणा | प्रतिनिधी

भाजप आमदार श्वेता महाले आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष आता पोलिस कारवाईनंतर आणखी तीव्र झाला आहे. महाले यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हा वाद श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर वाढला. कार्यक्रमातील ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर महिला वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली.

गायकवाडांची भूमिका : “गुन्हा खोटा; न्यायालयात आव्हान देणार”

गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी आपल्याकडून अश्लील हातवारे किंवा तसा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले. हा गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून FIR रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. गरज पडल्यास मंत्रालयासमोर आंदोलन किंवा उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला.

समर्थक आक्रमक; एसपी, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

गायकवाड यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी सोमवारी बुलढाण्यात शक्तिप्रदर्शन केले. सुरुवातीला पोलीस ठाण्याला घेराव घालण्याची भूमिका घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. गायकवाड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

साखरेचा दर आज ₹58; ₹45 वरून ₹75 पर्यंत वाढ, ग्राहकाला अजूनही ₹13 महाग

श्वेता महालेंचा आज पुन्हा हल्लाबोल

दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी श्वेता महाले यांनी पुन्हा गायकवाडांना लक्ष्य केले. “तुम्ही शिवसेना पक्ष वाढवत आहात की स्वतःचा परिवार?” असा सवाल करत त्यांनी गायकवाडांवर टीका केली. गायकवाड यांनी पक्षवाढीबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय सक्रियतेचा संदर्भही महालेंनी दिला. त्यामुळे दोन्ही आमदारांमधील वाद अद्याप निवळलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत

विशेष म्हणजे श्वेता महाले भाजपच्या, तर संजय गायकवाड हे शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार आहेत. दोन्ही पक्ष राज्यात महायुतीचा भाग असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील हा संघर्ष सातत्याने वाढत आहे. सुरुवातीच्या राजकीय टोलेबाजीपासून सुरू झालेला वाद आता पोलिस गुन्हा, आंदोलन आणि न्यायालयीन आव्हानाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

आता पोलिस तपासात पुढे काय निष्पन्न होते, गायकवाड न्यायालयात नेमकी कोणती भूमिका घेतात आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतृत्व या वादावर तोडगा काढते का, याकडे बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top