E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

श्रींच्या ११६व्या पुण्यतिथी उत्सवाला शेगावात सुरुवात; भजनी दिंड्यांचे आगमन

 गणेशयाग-वरुणयागाला सुरुवात; १६ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम

शेगाव | दि. १२ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे श्रींच्या ११६व्या पुण्यतिथी उत्सवाला शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी मंदिर परिसर सज्ज झाला असून, राज्याच्या विविध भागांतून भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘गजानन अवलिया अवतरले’च्या नामघोषाने संत नगरी भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

गणेशयाग व वरुणयागाला प्रारंभ

पुण्यतिथी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री गणेशयाग व वरुणयागाला प्रारंभ झाला. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान होणार आहे. त्यानंतर अश्व, पताकाधारी, टाळकरी यांच्या सहभागाने श्रींची पालखी परिक्रमा निघणार आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे; अभिनंदनाच्या बॅनरची बुलढाण्यात चर्चा

दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

उत्सवकाळात दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन आणि सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

दि. १२ सप्टेंबर रोजी ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, दि. १३ रोजी ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे, दि. १४ रोजी ह.भ.प. भरत बुवा चौधरी, तर दि. १५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.

श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प. भरत बुवा चौधरी यांचे विशेष कीर्तन होणार आहे.

काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता

बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दहीहंडी व गोपालकाल्याने पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला

उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिर परिसरात आकर्षक रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आंब्याच्या पानांची तोरणे आणि केळीचे खांब उभारण्यात आल्याने मंदिर परिसराला मंगलमय व उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान, पुण्यतिथी उत्सवासाठी येणाऱ्या भजनी दिंड्यांमुळे शेगावातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे. वारकरी संप्रदायातील ध्वज-पताका, टाळ-मृदुंग आणि नामघोषाने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाविकांसाठी महत्त्वाची सूचना; मंदिरात मोबाईल वापरास मनाई

श्रींच्या मंदिर परिसराचे पावित्र्य, सुरक्षा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच मोबाईल फोन बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांना श्रींचे सहज व सुरक्षित दर्शन मिळावे तसेच गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता यावे, यासाठी भाविकांनी संस्थानच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top