E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

हातरुण येथे गोठ्याला भीषण आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

संदीप भारसाकळे, बाळापुर प्रतिनिधी

दोन वासरे आणि गाय आगीत जखमी; चारा, सोयाबीन व हरभऱ्याचे कट्टे जळून खाक

हातरुण (ता. बाळापूर, जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे सोमवारी (९ नोव्हेंबर) पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोठ्यात साठवून ठेवलेला जनावरांचा चारा, सोयाबीन आणि हरभऱ्याचे कट्टे जळून खाक झाले. या घटनेत शेतकरी मनोहर तोताराम डोंगरे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर डोंगरे यांच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे स्वरूप लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच गोठ्यात असलेल्या जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आगीच्या झळांमुळे एक गाय आणि दोन वासरे जखमी झाली. गोठ्यात साठवलेला सोयाबीन, हरभऱ्याचे कट्टे तसेच जनावरांसाठी ठेवलेला चारा आणि सोयाबीनचे कुटार आगीत जळून खाक झाले.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नोंदणीतील त्रुटींची तपासणी कधी?

या आगीत शेतीमाल आणि जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे शेतकरी मनोहर डोंगरे यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. जखमी जनावरांवर तातडीने उपचार करावेत तसेच नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top