विशेष प्रतिनिधी बुलढाणा :
राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि खमंग बातमी समोर येत आहे. बुलढाण्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आज होणारा बहुचर्चित भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द झाला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी राहुल बोंद्रेंना भाजपमध्ये आणण्यासाठी मुंबईत जय्यत तयारी केली होती. मात्र, थेट दिल्लीतून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रेंना ‘फोन खणखणवला’ आणि संपूर्ण गेमच उलटवला. राहुल गांधींच्या या एकाच फोन कॉलमुळे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले असून बोंद्रेंनी भाजप प्रवेशाचा बेत गुंडाळत काँग्रेसमध्येच राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
“घाबरू नका, आम्ही पाठीशी आहोत!” – राहुल गांधींचा ‘तो’ धीर
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बोंद्रे हे काही राजकीय दबावामुळे आणि खोट्या प्रकरणांमुळे त्रस्त होऊन भाजपची वाट धरत असल्याची कुणकुण थेट राहुल गांधींपर्यंत पोहोचली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राहुल गांधींनी स्वतः बोंद्रेंना फोन लावला. “कोणत्याही दबावाखाली येऊ नका, घाबरण्याची गरज नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशा शब्दांत राहुल गांधींनी बोंद्रेंना धीर दिला.
चिखलीचे ‘बोंद्रे’ आता भाजपच्या तंबूत: केवळ पक्षांतर की सत्तेच्या अपरिहार्यतेचा नवा अंक?
…अन् राहुल बोंद्रे भावूक झाले!
दिल्लीतून थेट पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा फोन आल्यामुळे आणि त्यांनी पाठीवर हात ठेवल्यामुळे राहुल बोंद्रे प्रचंड भावूक झाले. त्यांनी राहुल गांधींना शब्द दिला की, “आता काहीही झाले, तरी मी काँग्रेस सोडणार नाही. माझे सर्वकाही गमावले तरीही मी तुमच्यासाठी आणि काँग्रेससाठीच प्रामाणिकपणे काम करेन.” या भावनिक संवादानंतर बोंद्रेंनी आपला भाजप प्रवेशाचा निर्णय तात्काळ रद्द केला.
आमदार श्वेता महालेंचा गेम प्लॅन फेल?
चिखली मतदारसंघात भाजप आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोंद्रेंना पक्षात घेऊन चिखलीतील काँग्रेस खिळखिळी करण्याचा मोठा प्लॅन भाजपने आखला होता. मुंबईत या पक्षप्रवेशासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आली होती. परंतु, राहुल गांधींच्या ‘पॉवर प्ले’मुळे श्वेता महाले आणि भाजपच्या नेत्यांचा हा गेम प्लॅन ऐनवेळी पूर्णपणे फेल ठरला आहे.
या हायव्होल्टेज ड्रामानंतर बुलढाणा आणि चिखलीच्या राजकारणात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, भाजपला मात्र मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.


