E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनल पंच म्हणून निवड; शेगाव क्रिकेट अकॅडमीचा गौरव

शेअर करा : 𝕏

 

शेगाव : शेगाव क्रिकेट अकॅडमीचे पंच पियुष रघुवंशी यांची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेट पॅनल पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शेगावसह बुलढाणा जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

 

VCAकडून घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि प्रत्यक्ष सामन्यांतील कामगिरीच्या मूल्यांकन प्रक्रियेत पियुष रघुवंशी यांनी यश मिळविले. VCAच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच आणि BCCIचे अधिकृत परीक्षक विनीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

क्रिकेटच्या नियमांचे ज्ञान, अचूक निर्णयक्षमता तसेच मैदानावर दबावाच्या परिस्थितीत संयम राखण्याची क्षमता यामुळे पियुष यांनी स्थानिक आणि विभागीय क्रिकेट स्पर्धांमध्ये पंच म्हणून आपली ओळख निर्माण केली. VCAच्या स्टेट पॅनलवर निवड झाल्यानंतर त्यांच्यासमोर वरिष्ठ स्तरावरील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी निर्माण झाली आहे.

 

जिल्हा क्रिकेट क्षेत्रातून अभिनंदन

बुलढाणा जिल्हा क्रिकेट कमिटीचे संयोजक किशोर वाकोडे यांनी पियुष रघुवंशी यांच्या निवडीचे स्वागत केले. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणि मॅच ऑफिशियल्सना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उच्च स्तरावर कामगिरी करू शकतात, हे पियुष यांच्या यशातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेगाव क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राम ढोरे यांनीही पियुष यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. क्रिकेटमधील त्यांची आवड, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांनी पंच म्हणून प्रगती केली असून, त्यांच्या यशामुळे शेगावमधील युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

अकॅडमीचे सहाय्यक प्रशिक्षक सर्वेश शर्मा तसेच मार्गदर्शक मुन्ना साबीर, इम्रान खान आणि चंद्रकांत साळुंके यांनी पियुष रघुवंशी यांचे अभिनंदन केले.

पालखी मार्गावर मंगळसूत्र चोरी; चार संशयित जेरबंद, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय स्तराच्या दिशेने वाटचाल

VCA स्टेट पॅनलवरील निवड ही क्रिकेट पंच म्हणून पियुष रघुवंशी यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची पायरी मानली जात आहे. आगामी काळात वरिष्ठ विभागीय, जिल्हास्तरीय, निमंत्रित तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते. भविष्यात BCCIच्या राष्ट्रीय स्तरावरील पंच पॅनलकडे वाटचाल करण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

पियुष रघुवंशी यांच्या यशामुळे शेगाव क्रिकेट अकॅडमी आणि बुलढाणा जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

1 thought on “पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनल पंच म्हणून निवड; शेगाव क्रिकेट अकॅडमीचा गौरव”

  1. Pingback: महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २०२६ स्थगित; शासकीय कार्यालयांना निर्देश - E-Jansamuh News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top