E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

बुलढाण्यात पावसाची मोठी तूट; खरीप पिके संकटात

शेअर करा : 𝕏

९२ महसूल मंडळांत चिंताजनक स्थिती; ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ २५.९ टक्के पाऊस

 

बुलढाणा : जुलैअखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्यातून अक्षरशः पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या अवघा २५.९ टक्के पाऊस नोंदला गेला असून तब्बल ७४.१ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांपैकी अनेक मंडळांत ऑगस्ट महिन्यात अवघे एक ते तीन दिवसच पाऊस झाल्याने खरीप पिकांसमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. जवळपास महिनाभर समाधानकारक पाऊस न झाल्याचा थेट परिणाम शेतातील पिकांवर दिसून येत आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ८ सप्टेंबरला १२ तासांचा रेल्वे ब्लॉक

 

सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. फुलगळ होत असून शेंगांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

पावसाची मोठी तूट, पावसाचे अत्यल्प दिवस आणि मंडळनिहाय असमान वितरण, या तिहेरी संकटामुळे खरीप हंगामाचे पुढील गणित आता सप्टेंबरमधील पावसावर अवलंबून आहे. पिकांना निर्णायक टप्प्यावर पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

उत्पादनात घट झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top