E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

शून्यातून उभारला जागतिक उद्योगसमूह; शेगावच्या दांपत्याला ‘विदर्भ गौरव’ पुरस्काराचा मान

शेअर करा : 𝕏

‘सुजाता इंजिनिअरिंग’ची यशस्वी घोडदौड; कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची देशासह आफ्रिकेतही निर्यात

शेगाव | प्रतिनिधी
जिद्द, दूरदृष्टी आणि गुणवत्तेची अविरत साधना याच्या जोरावर शून्यातून जागतिक उद्योगसमूह उभारणाऱ्या शेगावच्या दांपत्याने विदर्भाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अकोला एमआयडीसीतील ‘सुजाता इंजिनिअरिंग’ या कंपनीला महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘विदर्भ गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, नागपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेगाव : राजधानी साडी शोरूमसमोरील वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; ‘नो पार्किंग झोन’ची मागणी

अवघ्या सहा वर्षांत सुजाता इंजिनिअरिंगने कृषीअन्न प्रक्रिया उद्योगासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कंपनीकडून विकसित करण्यात आलेले डाळ मिल, बेसन, आटा आणि मसाला प्लांटसाठीचे आधुनिक प्रकल्प आज देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर मोझांबिक, केनिया, डीआर काँगो, अंगोला आणि टांझानिया या आफ्रिकन देशांमध्येही कंपनीची यंत्रसामग्री निर्यात होत असून, विदर्भातील उद्योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत आहे.

कंपनीच्या संचालिका डॉ. सुजाता तायडे आणि अॅड. पल्लवी सोनवणे यांनी तांत्रिक गुणवत्ता, नावीन्यपूर्ण विचार आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसूत्रीवर कंपनीची भक्कम उभारणी केली आहे. यापूर्वीही कंपनीला ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड’ प्राप्त झाला असून, सलग मिळणारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शेगावातून सुरू झालेला प्रवास; आज जागतिक यशाची गाथा

शेगावच्या आम्रपाली नगर येथील रहिवासी आणि व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक असलेल्या डॉ. सुजाता तायडे यांच्या यशामागे उद्योगपती राजेश तायडे यांचा दीर्घ संघर्ष आणिदूरदृष्टीची प्रेरणादायी कहाणी आहे.

तब्बल १५ वर्षे आफ्रिकेत नोकरी केल्यानंतर त्यांनी २००६ मध्ये अकोला एमआयडीसीमध्ये तुलसीयन पेट इंडस्ट्रीजची स्थापना केली. सातत्यपूर्ण प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे आज त्यांच्या उद्योगसमूहाचा विस्तार अकोला, वसई आणि अहमदनगरपर्यंत झाला आहे.

“तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे,” असा प्रेरणादायी संदेश राजेश तायडे देतात. त्यांच्या या विचारांचा प्रत्यय सुजाता इंजिनिअरिंगच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो.

शेगावसारख्या शहरातून जागतिक बाजारपेठेत यशस्वी झेप घेणाऱ्या या दांपत्याने सिद्ध करून दाखवले आहे की, मोठे यश मिळवण्यासाठी मोठी पार्श्वभूमी लागत नाही; लागते ती मोठी स्वप्ने, अथक परिश्रम, नावीन्यपूर्ण विचार आणि गुणवत्तेशी असलेली निष्ठा. सुजाता इंजिनिअरिंगची ही यशोगाथा विदर्भातील नवउद्योजकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top