E-Jansamuh News

BREAKING
लोड होत आहे...

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; कथित अनैतिक गैरप्रकारांविरोधात मनसेची कठोर कारवाईची मागणी

शेअर करा : 𝕏

शेगाव | प्रतिनिधी

संतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरातील खेतान चौक, गांधी चौक तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील काही गेस्ट हाऊसमध्ये कथित अनैतिक गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारींमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शेगाव शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मनसेच्या निवेदनानुसार, धार्मिक व आध्यात्मिक ओळख असलेल्या शेगाव शहरातील काही ठिकाणी सुरू असल्याचा आरोप असलेल्या गैरप्रकारांमुळे शहराच्या सामाजिक आणि धार्मिक प्रतिमेला धक्का बसत आहे. या प्रकारांमुळे महिला, विद्यार्थिनी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, संबंधित परिसरात महिलांना मुक्तपणे वावरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात एका स्थानिक महिलेचा संदर्भ देत, काही दिवसांपूर्वी ती आपल्या लहान मुलांसह संबंधित परिसरातून जात असताना तिला आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सन्मानासह त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र बंदला शेगावात प्रतिसाद; विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे शांततापूर्ण आंदोलन

हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीश भावरकर आणि शहराध्यक्ष परमेश्वर लाहूडकर यांनी संबंधित गेस्ट हाऊसची सखोल चौकशी करून कथित अनैतिक गैरप्रकारांवर तातडीने आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवेदन सादर करताना वाहतूक सेना अध्यक्ष राम इंगळे, तालुका उपाध्यक्ष रोहित भांबरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार, सुनील वणारे, वैभव देशमुख, शुभम झाकर्डे, प्रफुल तायडे, गोपाल तायडे, दीपक ठाकरे, मंगेश काठोळे, विजू लांबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top