शेगाव, दि. २३ (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाऊ न शकलेल्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थानने विशेष नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी श्रींचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असून भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मराठवाडा, खान्देश, जळगाव तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी दाखल होत असतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरती व भजनाने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ तसेच श्रींच्या पालखीची मंदिर परिसरात परिक्रमा काढण्यात येणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार असून भक्तांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
दर्शन, महाप्रसाद व निवासाची विशेष व्यवस्था
संस्थानच्या वतीने २४ जुलैच्या रात्रीपासून २५ जुलै दिवसभर श्री समाधी दर्शन व श्रीमुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. तसेच संस्थानच्या भक्तनिवासामध्ये नियमानुसार निवास व्यवस्था सुरू असून दूरवरून येणाऱ्या भाविकांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
सेवेकरी सज्ज, स्वच्छतेलाही प्राधान्य
मंदिर परिसरात स्वच्छता, शिस्त आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानचे सेवेकरी सतत कार्यरत राहणार आहेत. दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्गदर्शन आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले असून आषाढी एकादशी उत्सव काळात भाविकांना शांत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी संस्थानने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत गजानन महाराजांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी संस्थानच्या सूचनांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


