विशेष प्रतिनिधी, शेगाव:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (प्रि. अप्पर प्रायमरी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये शेगाव तालुक्याने पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे. तालुक्यातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी कु. श्रेया विलास राऊत हिने इयत्ता ५ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत (Merit List) तब्बल ८ व्या श्रेणीत मानाचे स्थान पटकावले आहे. श्रेयाच्या या अभूतपूर्व यशामुळे शेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘गुड टच-बॅड टच’चे धडे; शेगाव पोलिसांचा विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुढाकार
निकाल आणि परीक्षेचा प्रवास
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभरात ही शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली होती. या अत्यंत चुरशीच्या परीक्षेचा अंतरिम निकाल १८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सर्व आक्षेप आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, नुकतीच जुलै महिन्यात अधिकृत अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीमध्ये श्रेयाच्या नावाने सुवर्णक्षरांनी हजेरी लावत तिच्या कष्टाचे सार्थक केले आहे.
श्रेयाचे वडील विलास राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “श्रेया अभ्यासात नेहमीच हुशार आणि जिद्दी आहे. शाळेतील शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि तिने दिवस-रात्र घेतलेली मेहनत यामुळेच आज हे यश पाहायला मिळत आहे.”
श्रेया ठरली इतरांसाठी प्रेरणादायी
कोणतीही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा महागड्या शिकवण्या नसताना, केवळ दृढ निश्चय आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील राज्यस्तरीय परीक्षेत अव्वल येऊ शकतात, हे श्रेयाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर शेकडो विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद आणि प्रेरणा देणारे ठरेल, यात शंका नाही.
अभिनंदनाचा वर्षाव
तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी, सर्व शिक्षक वृंदाने आणि शेगाव तालुक्यातील गणमान्य व्यक्तींनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. सध्या शेगाव परिसरात श्रेयावर आणि तिच्या कुटुंबावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डिजिटल मीडिया टीमतर्फे कु. श्रेया विलास राऊत हिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि तिच्या पुढील उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!


