संस्थेच्या प्रगतीत प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – संस्थाध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरुंगले
शेगाव, दि. 31 ऑगस्ट 2026 : कोणत्याही शैक्षणिक संस्थेची प्रगती केवळ इमारती, सुविधा आणि व्यवस्थापनामुळे होत नाही, तर त्यामागे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान असते. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध हे केवळ कार्यालयीन न राहता कौटुंबिक स्वरूपाचे असले पाहिजेत. अशा विश्वासार्ह आणि संस्थेशी एकनिष्ठ राहिलेल्या कर्मचाऱ्यांमुळेच संस्था अधिक सक्षम बनते, असे प्रतिपादन बुरुंगले एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरुंगले यांनी केले.
बुरुंगले विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावलेल्या संतोष नारायणराव जानकर आणि धर्माजी रामचंद्र बुरुंगले यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
प्रामाणिक सेवेमुळे संपादन केली विश्वासार्हता
प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले संतोष जानकर आणि नाईक म्हणून सेवा बजावणारे धर्माजी बुरुंगले यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे सेवा देत संस्थेचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कार्यनिष्ठेमुळे ते बुरुंगले एज्युकेशन सोसायटीचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ ठरल्याचे गौरवोद्गार संस्थाध्यक्षांनी काढले.
संस्थेच्या परिवाराचा एक भाग बनून काम करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देताना हृदय भरून येते आणि अंतःकरण जड होते, अशा भावनिक शब्दांत बापूसाहेब बुरुंगले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दाम्पत्यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार
या सेवापूर्ती सोहळ्यात संतोष नारायणराव जानकर व त्यांच्या पत्नी अलकाताई जानकर, तसेच धर्माजी रामचंद्र बुरुंगले व त्यांच्या पत्नी हौसाताई बुरुंगले यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार संस्थाध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरुंगले आणि विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षीताई बुरुंगले यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेच्या सहकार्यामुळे जीवनात प्रगती
सेवापूर्ती सत्काराला उत्तर देताना जानकर दाम्पत्यांनी, बुरुंगले एज्युकेशन सोसायटी आणि बुरुंगले परिवाराच्या सहकार्यामुळे जीवनात प्रगती साधता आल्याची भावना व्यक्त केली.
तर धर्माजी बुरुंगले यांनी आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाचे श्रेय संस्थाध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरुंगले, प्राचार्या मीनाक्षीताई बुरुंगले आणि बुरुंगले परिवाराला दिले.
या प्रसंगी वातावरण भावनिक झाले होते. अनेक वर्षांच्या सेवेत निर्माण झालेले संस्थेशी आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कौटुंबिक आणि भावनिक कार्यक्रमात प्राचार्या मीनाक्षीताई बुरुंगले, डॉ. रमेश राठोड आणि सागर रायणे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी विमलताई गोरे, तळेगाव, संजय जानकर आणि उपप्राचार्य शिवाजी निळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा कोकाटे मॅडम यांनी केले, तर प्रा. पवन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गोळेगाव बु.ची समीक्षा ठरली प्रेरणादायी; NEET मध्ये 475 गुण, MBBS प्रवेश निश्चित
संस्थेतील माणुसकीच्या नात्याचे दर्शन
सेवापूर्ती हा केवळ नोकरीच्या कार्यकाळाचा शेवट नसून, संस्थेसोबतच्या अनेक वर्षांच्या नात्याचा भावनिक टप्पा असतो. बुरुंगले एज्युकेशन सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास, आपुलकी आणि कौटुंबिक नातेसंबंधांचे दर्शन घडले.
संतोष जानकर आणि धर्माजी बुरुंगले यांनी आपल्या सेवेतून संपादन केलेली विश्वासार्हता आणि संस्थेप्रती दाखविलेली निष्ठा ही भावी कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Pingback: पहूर पूर्णा गावातील घरांच्या नमुना ८ नोंदी गायब? मनसेचा शेगाव प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम - E
Pingback: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलै 2026 पासून DA मध्ये 3 टक्के वाढीची शक्यता; 63% महागाई भत्ता म